जिल्ह्यात गतवर्षी ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पावसाचा फटका बसल्याने, सोयाबीनच्या उत्पादनात घट आली, तर दर्जाही खालावला. दुसरीकडे ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना, घाणा, चीन या देशांतही सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची मागणी वाढली. परिणामी, सोयाबीनच्या दरात कमालीची तेजी आणि सोयाबीनच्या दराने कधी नव्हे, ते विक्रमी ११ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंतची पातळी गाठली. शेतकऱ्यांनी बाजारातील लिलावात टाकलेले सोयाबीन हातोहात मोठ्या भावात विकले जाऊ लागले. दरातील तेजीत सातत्य असल्याने व्यापाऱ्यांनी काही प्रमाणात सोयाबीनची खरेदी करून ते साठविले. सोयाबीनच्या दरात तेजी कायम असल्याने, सोयाबीनसह इतर खाद्य तेलाचे दरही कडाडले सोयाबीनचे तेल १६० रुपये, तर शेंगदाणा तेलाचे दर प्रती किलो २०० रुपयांच्या वर पोहोचले. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने गत आठवड्यात १५ लाख टन सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतला आणि देशांतर्गत सोयाबीनचे दर कोसळू लागले. अवघ्या आठवडाभरात या शेतमालाच्या दरात अडीच ते तीन हजार रुपये प्रती क्विंटलची घसरण झाली आहे. ही घसरण व्यापाऱ्यांना अडचणीत टाकणारी आहे. काही व्यापाऱ्यांनी मधल्या काळात सोयाबीनमधील तेजीचा विचार करून थोडथोडके सोयाबीन साठवून ठेवले आहे. आता दर घसरल्याने त्यांना मोठा फटका बसणार आहे.
----------
शासनाच्या धोरणानेच व्यापारी संभ्रमात
सोयाबीनच्या दरातील तेजीचा विचार करून काही व्यापाऱ्यांनी सोयाबीनची खरेदी करून, त्यापैकी काही प्रमाणात सोयाबीन साठवून ठेवले होते. आता शासनाने सोयाबीन आयातीचा निर्णय घेतल्यानंतर, सोयाबीनचे दर घसरत असताना व्यापारी संभ्रमात सापडले आहेत. बाजारात फारशी आवक नसली, तरी खरेदी करताना मालाचा उठाव होईल, एवढाच विचार करून खरेदी केली जात आहे. तथापि, अद्यापही बाजारात सोयाबीन शिल्लक राहत नसल्याचे दिसते.
----
कोट: सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. एखाद दिवशी पाचशे ते हजार रुपयांनी दर घसरते, तर दुसऱ्या दिवशी लगेच वाढही होत असल्याचे आढळून येते. व्यापाऱ्यांनी सोयाबीनची साठवणूकही केलेली नसून, व्यापाऱ्यांकडे आता सोयाबीन शिल्लकही राहिले नाही.
-आनंद चरखा, अध्यक्ष व्यापारी युवा मंडळ, वाशिम.