नाफेडवर मोजणी होईना: बाजार समित्यांकडे तुरीची आवक वाढली वाशिम: नाफेडच्यावतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या तुरीच्या खरेदीला आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली असली तरी, या ठिकाणी माल मोजणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी आता बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडे आपला कल केला असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये दररोज तुरीची आवक वाढली आहे. १२ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांकडे ४ लाख ५७ हजार ७५३ क्विंटल तर नाफेडकडे १ लाख ८२ हजार ६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. बाजार समितीत तुरीला सरासरी किमान ४ हजार ९२ रुपए, तर कमाल ४ हजार ४५८ रूपयाचा भाव मिळत आहे. जिल्ह्यात यावर्षी तुरीच्या उत्पन्नात वाढ झाल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून तुरीच्या भावात मोठी घसरण करण्यात आली. या भावात तुर परवडत नसल्याने कारण समोर करत तुर जादा दराने खरेदी करण्यास विरोध दर्शविला होता. शेतकर्यांची ओरड होत असल्याने शासनाने तुरीला पाच हजार पन्नास रूपयांचा हमीभाव देऊन नाफेड तुर खरेदी केंद्र सुरू केले होते. तुरीला जास्त भाव मिळत असल्याने नाफेड तुर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली. या ठिकाणी शेतकऱ्यांना तुरीची मोजणी करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागत आहे. त्यातच नाफेडची खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर नाफेडवर आधीच हजारो क्विंटल माल पडून असल्याने अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. दरम्यान, कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी नाफेडच्या खरेदीला आणखी सात दिवसांची मुदत वाढ दिल्याची घोषणा शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केली तरी, या ठिकाणी पूर्वीच पडून असलेला माल मोजला जाण्याची शक्यता नसल्याने शेतकरी नाफेडकडे माल देण्यास उत्सूक नसल्याचे दिसत आहे.
तूर उत्पादकांचा कल व्यापाऱ्यांकडे
By admin | Updated: April 16, 2017 20:25 IST