रिसोड : तालुक्यातील लोणी खुर्द येथे स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी आवश्यक असलेले शेड नसल्यामुळे उघड्यावर मृतदेह जाळले जातात. तसेच येथे स्मशानभूमी म्हणून आवश्यक असणार्या कोणत्याच सोयीसुविधा नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी गावातून व दुरवरच्या गावांमधून येणार्या लोकांची गैरसोय होत आहे. स्मशानभूमी शेडसाठी जागा उपलब्ध नसल्याची माहिती आहे. लोणी खुर्द व आसोला या दोन गावाची गटग्रामपंचायत आहे. लोणी खुर्द गावची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. या गावात सर्वधर्मियबांधव गुण्यागोविंदाने नांदतात. येथे शासनाची ई क्लास जमिन आहे. मात्र, त्यावर अतिक्रमण झाल्याने आता इ-क्लास जमीन शिल्लक नाही. नेमके हेच कारण पुढे करून स्मशानभूमी शेडसाठी जागाच नाही, असे सांगितले जाते. स्मशानभूमी शेड उभारण्यात आलेले नसल्यामुळे गैरसोय होत आहे. अंत्ययात्रेत सहभागी होणार्या लोकांना बसण्यासाठी ओटे, पिण्यासाठी व पाय धुण्यासाठी नळ अथवा पाण्याच्या साठवणुकीची कोणतीही व्यवस्था नाही. मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. पावसाळय़ाच्या दिवसात अंत्यसंस्कार करण्यासाठी एकतर पाउस थांबण्याची वाट पाहावी लागते; नाही तर मृतदेहावर आच्छादन म्हणून ताडपत्री किंवा अन्य काहीतरी धरुन अग्नी द्यावा लागतो. अशा स्थितीत अंत्यसंस्कारासाठी आधीच पोहोचविलेली लाकडे पावसाने भिजून ओली होतात. ती लवकर पेटत नाहीत. त्यामुळे मृतदेहाला अग्नी देताना अनेक अडचणी येतात. रात्रीच्या वेळेस पथदिवे किंवा दिव्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना बॅटरी, गॅसबत्ती यासारखी पर्यायी साधने नेऊन अंत्यसंस्काराचा विधी उरकावा लागतो. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन जागा उपलब्ध करून देणे गरजेचे ठरत आहे.
स्मशानभूमीसाठी जागा नाही
By admin | Updated: July 13, 2014 22:39 IST