मंगरुळपीर (वाशिम): किन्हीराजा महावितरण कार्यालयांतर्गत येत असलेल्या पिंप्री अवगण गावाचा तालुका मंगरूळपीर असताना वीज देयकांवर मालेगाव तालुक्याचा उल्लेख करण्यात येत आहे आणि तो आजही कायम असल्याने तेथील नागरिकांना शासकीय, निमशासकीय कामात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असल्याची तक्रारी पुढे येत आहे.किन्हीराजा सब स्टेशनच्या वीज पुरवठय़ाचा तथा मंगरूळपीर तालुक्याच्या अंतिम टोकावर येत असलेल्या पिंप्री अवगण गावाचा समावेश मालेगाव तालुक्यातून मंगरूळपीर तालुक्यात होऊन अनेक वर्ष पार पडली; मात्र महावितरण कार्यालयाने तालुक्याचा उल्लेख बदला नसल्याने वीज ग्राहकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शासकीय किंवा निमशासकीय कामात वीज देयकावरील पत्ता महत्त्वाचा पुरावा मानला जातो; परंतु या रहिवासी पुराव्यात मालेगाव तालुक्याचा उल्लेख कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे समोर आले आहे. वीज देयकाची दुरुस्ती म्हटले तर वीज ग्राहकांना मालेगाव येथील सहाय्यक अभियंताच्या कार्यालयात जावे लागते आहे. ग्राहकांना ते न परवडणारे झाले असून, बिलाची किरकोळ दुरुस्ती असो की नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी मालेगाव जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रवास भाड्याचा मोठा भुर्दंड बसतो आहे.
पिंप्री अवगण गावाचा महावितरणने बदलला तालुका
By admin | Updated: October 27, 2014 00:58 IST