गावपातळीवर काम करताना प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय असणे अपेक्षित आहे. मात्र, स्वतंत्र कार्यालयापासून जिल्ह्यातील बहुतांश तलाठी वंचित आहेत. महसूल विभागाचा कणा म्हणून तलाठ्यांना ओळखले जाते. वाशिम तालुक्यात तलाठ्यांची एकूण ५२ पदे मंजूर असून जवळपास ४४ ते ४५ तलाठी कार्यरत आहेत. वाशिम शहरातील सांजे तसेच वाई, राजगाव, अनसिंग आदी १० ते १२ ठिकाणचा अपवाद वगळता उर्वरित तलाठ्यांना अद्याप स्वतंत्र कार्यालय नाही. त्यामुळे भाड्याच्या खोलीत किंवा अन्य ठिकाणी बसून कामकाज करण्याची वेळ तलाठ्यांवर आली आहे. तलाठ्यांना भाड्यापोटी एक हजार रुपये महिनाही नियमित मिळत नाही. गावपातळीवर बहुतांश तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालयच उपलब्ध नसल्याने तलाठ्यांना कामकाजासाठी निश्चित ठिकाण नाही. त्यामुळे कामकाजासंदर्भात तलाठ्यांना शोधण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. आता शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामांसाठी तलाठ्यांच्या दाखल्याची आवश्यकता असते. तलाठी कार्यालयासाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने स्वतंत्र कार्यालयाचा प्रश्न प्रलंबित आहे.
तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालय मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:39 IST