अनसिंग (जि. वाशिम ) : गावाजवळ असलेल्या विहिरीमध्ये २८ वर्षीय महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जुलैला सकाळी उघडकीस आली. अनसिंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उकळीपेन येथील फिर्यादी रवि चोखाजी धवसे यांनी अनसिंग पोलीस स्टेशनला २३ जुलैला त्यांची बहीण वर्षा श्रीराम भगत रा. उकळीपेन ही गुरुवारी सकाळी मालेगावला कोर्टाच्या कामानिमित्त आई वडिलाच्या घरुन निघून गेली होती, परंतु सायंकाळी परत आली नाही. त्यामुळे रवि धवसे यांनी पोलीस स्टेशनला बहीण हरवल्याची तक्रार दिली. २४ जुलै शुक्रवारला अचानक गावाजवळ असलेल्या विहिरीमध्ये वर्षा श्रीराम भगत हिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. सदर माहिती मिळताच अनसिंगचे ठाणेदार डी.एम. घुगे, पोहेकॉ रमेश वानखेडे, संजय चालक यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतकाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अनसिंग ग्रामीण रुग्णालयात हलविला. सदर विवाहित महिला गेल्या अनेक वर्षापासून उकळीपेनला आपल्या माहेरी राहत होती. तिला दोन मुले असून तिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. पुढील तपास ठाणेदार घुगे करीत आहेत.
महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By admin | Updated: July 25, 2015 01:40 IST