वाशिम : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशिम येथे त्वरित सुरू करण्यासाठी विद्यापीठ उपकेंद्र संघर्ष समिती व जिल्हय़ातील विविध संघटनांनी आज (९ एप्रिल) स्थानिक पोस्ट ऑफिसनजीकच्या जिजाऊ चौकात ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे अकोला-नांदेड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी १६ आंदोलनकर्त्यांंना अटक करून त्यांची सुटका केली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशिम येथे व्हावे, असा ठराव अमरावती विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकीत सन १९९५-९६ साली मंजूर झाला. यासंदर्भात विद्यापीठानेही शासनाकडे ठराव पाठविला आहे. त्यास तत्त्वत: मान्यता देऊन शासनाने वाशिम येथे विद्यापीठ उपकेंद्रासाठी जमीन अधिग्रहित करण्याची सूचना विद्यापीठाला केली होती. त्यानुसार, वाशिमलगतच्या बाभुळगाव येथे ई-क्लास गट नं. १८६-१८७ मधील १0२.९८ एकर जमीन विद्यापीठ उपकेंद्रासाठी मंजूर करण्यात आली. ही जमीन विद्यापीठाला हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव वाशिम जिल्हाधिकार्यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे; परंतु हा प्रस्ताव सन २0१३ पासून आजपर्यंत शासनदरबारी प्रलंबित आहे. दरम्यान, विद्यापीठ उपकेंद्राकरिता जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना व विद्यापीठ उपकेंद्र तत्त्वत: वाशिम येथे मंजूर झाले असताना हे उपकेंद्र अकोला येथे स्थलांतरित करण्याचा घाट रचला जात आहे. या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन केले.
संघर्ष समितीने केला रास्ता रोको
By admin | Updated: April 10, 2015 02:17 IST