सुनील काकडे वाशिम, दि. १२: निसर्गाचा लहरीपणा, पावसातील प्रदीर्घ खंड आणि महावितरणची अवकृपा अद्याप कायम असल्याने जिल्ह्यातील प्रमुख पीक सोयाबीनची नुकसान पातळी ५0 टक्क्याच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात यंदाही मोठी घट होईल, अशी भीती शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात यंदा ४ लाख १ हजार ५४७ हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी करण्यात आली. त्यात तूर ६0 हजार १४७ हेक्टर, मूग १२ हजार ६00 हेक्टर, उडीद १५ हजार २१७ हेक्टर, ज्वारी ५ हजार २९१ हेक्टर, कपाशी १८ हजार ७३0 हेक्टर यासह इतर किरकोळ स्वरूपातील पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक क्षेत्रावर अर्थात २ लाख ८८ हजार ६३२ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. नगदी आणि हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणार्या सोयाबीनने मात्र गत तीन वर्षाप्रमाणे यंदाही शेतकर्यांना मोठा दगा दिला आहे. ऐन शेंगा भरण्याच्या काळात पावसाने मारलेल्या दीर्घ दडीमुळे सध्या या पिकाची दयनीय अवस्था झाली असून, शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अहोरात्र काबाडकष्ट करूनही डोळ्यादेखत सोयाबीनची राखरांगोळी होत असल्याचा अनुभव जिल्ह्यातील शेतकर्यांना येत आहे. कृषी विभागाने ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन सोयाबीनची पाहणी करावी आणि झालेली नुकसानभरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्यांमधून जोर धरत आहे.
सोयाबीनच्या उत्पादनात होणार मोठी घट!
By admin | Updated: September 13, 2016 02:58 IST