मंगरुळपीर (वाशिम ) :तालुक्यातील ग्राम माळशेलू येथे साडेनऊ एकरातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिल्याची घटना २४ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत सदर शेतकर्यांचे १ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठय़ांनी केला आहे.माळशेलू येथील निलेश विठ्ठलराव धामंदे, उमेश विठ्ठलराव धामंदे, रूख्माबाई धामंदे यांच्या मालकीच्या साडेनऊ एकरातील सोंगुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिले. या आगीत ५0 क्विंटल सोयाबीन १ लाख ५0 हजार, २८ हजारांचे स्प्रिंकलर पाईप व ४ हजाराची ताडपत्री असा एकूण १ लाख ८२ हजाराचे सोयाबीन व साहित्य जळुन खाक झाले, असा पंचनामा तलाठी पी.बी मोरे यांनी केला आहे. सदर शेतकरी मोलमजुरीने दुसर्यांच्या शेतात सोयाबीन सोंगणीसाठी गेले होते. त्याच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याचे समजल्यानंतर त्यांनी शेताकडे धाव घेतली; मात्र ते तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती.
सोयाबीनच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान
By admin | Updated: October 25, 2014 00:13 IST