वाशिम : आकाराने छोटा व विकासाच्या दृष्टीने अविकसित असलेला वाशिम जिल्हा, साहित्य चळवळीसाठी मात्र विदर्भात उजवा ठरतो. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या साहित्य संमेलने व व्याख्यानमालेने या सत्यावर मोहोर लावली आहे. गोर बंजारा समाजाचे अखिल भारतीय साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, शासनाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव, सोळा वर्षांची परंपरा असलेली हरी व्याख्यानमाला तसेच शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांनी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील साहित्य क्षेत्रात रंगत भरली. ६ व ७ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन पार पडले. गोर बंजारा समाजाचे हे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन असून, या संमेलनाने या चळवळीचा पाया वाशिममध्ये रोवल्या गेला आहे. या संमेलनात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील साहित्यिक, कवी, प्राध्यापकांसह तांड्यातील नागरिकही सहभागी झाले होते. ह्यलिहिते व्हा!ह्ण, हा संदेश या संमेलनातून देण्यात आला. तसेच बंजारा भाषेचे संवर्धन हा मुख्य उद्देश समोर ठेवून पुढील दिशा ठरविण्यात आली. आजपर्यंत शिक्षणापासून दूर राहलेल्या या समाजात लिहिणारे आणि वाचणारे कमीच आहेत. त्यांचे प्रमाण वाढावे, हाच संदेश या संमेलनातून देण्यात आला. या दोन दिवसांत एसएमसी महाविद्यालयात हरी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. १६ वर्षांची या व्याख्यानमालेला परंपरा आहे. यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी साहित्यावर लिखाण करणारे बारोमासकार प्रा. सदानंद देशमुख यांचे व्याख्यान पार पडले. शेती व शेतकर्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वास्तव त्यांनी मांडले. साहित्यिकांना लिहिण्याची ऊर्जा कशी मिळते, आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून साहित्य कसे पाझरते, हे त्यांनी आपल्या अनुभवातून मांडले. तसेच ग्रामीण साहित्यिक प्रा. प्रतिमा इंगोले यांच्या व्याख्यानानेही वाशिमकरांच्या माहितीत भर घातली. यानंतर लगेच शासनाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथोत्सवाचे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या तीनही दिवसांत दिवसभर भाषणे, कविसंमेलने, चर्चासत्र, परिसंवाद पार पडले. ग्रंथोत्सवात वारकर्यांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला. प्रतिमा इंगोले यांनी उद्घाटन कार्यक्रमात वाशिमची ऐतिहासिक प्रतिभा किती प्रगल्भ आहे, हे दाखविले. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रंथपालांची या ठिकाणी उपस्थिती होती.
वंचितांच्या आवाजाला साहित्याचे कोंदण!
By admin | Updated: February 20, 2016 02:19 IST