वाशिम, दि. ११: मागील काही दिवसांपासून नव्या धान्याची आवक सुरू झाल्यानंतर तूर, मूग आणि उडीद या कडधान्याचे दर दिवसेंदिवस घसरत असतानाही बाजारात डाळींचे दर मात्र कडाडलेलेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची चांगलीच गळचेपी होत आहे.खरीप हंगामातील मूग आणि उडीद ही पिके कमी दिवसांची असल्यामुळे बाजारात या पिकांच्या धान्याची आवक मागील १५ दिवसांपासून सुरू झालेली आहे. या कडधान्याची आवक सुरू होण्यापूर्वीच धान्य बाजारात विविध धान्यांचे दर कोसळणे सुरू झाले होते. यामध्ये प्रामुख्याने तूर, मूग आणि उडीद या कडधान्यांचा समावेश आहे. सात ते आठ महिन्यांपूर्वी १६ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला उडीद आता ७ हजार रुपये अर्थात अध्र्याहून कमी दरातही खपेनासा झाला आहे. जवळपास १५ हजार रुपये असलेली तूर, आता सहा ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलही खपेनासी झाली आहे. त्याशिवाय ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल खपणारा मूग आता पाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आत खपत आहे. आता कडधान्याचे भाव अध्र्यावर आले असताना डाळींचे दर मात्र कमी झालेले नाहीत. जिल्ह्यातील बाजारातून घेतलेल्या आकडेवारीनुसार मूग डाळ ९0 ते १00 रुपये प्रतिकिलो, उडीद डाळ १२0 ते १३0 रुपये प्रतिकिलो आणि तुरीची डाळही ११0 ते १२0 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यावरून बाजार व्यवस्था सर्वसाधारण जनतेची लूट करीत असल्याचे स्पष्ट होत असून, शासनाने दखल घेणे आवश्यक आहे.
दर घसरूनही डाळींचे दर कडाडलेलेच!
By admin | Updated: September 12, 2016 02:59 IST