रिसोड : तालुक्यातील गोवर्धन येथे आयोजित नागपंचमी उत्सवानिमित्त एकाच तब्बल एक लाख भाविकांनी चंदनशेष महाराजांचे दर्शन घेतले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे उत्सव शांततेत पार पडला. रिसोड तालुक्यातील गोवर्धन हे गाव चंदनशेष महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आहे. नागपंचमीनिमित्त येथे दरवर्षी यात्राउत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी लाखो भाविक चंदनशेष महाराजांच्या मंदिरावर दर्शनासाठी येत असतात. त्याशिवाय परिसरातील १0 ते १२ गावांतील बारीधारक नागपंचमीनिमित्त येथे बारी म्हणण्यासाठी येत असतात. यंदाही शुक्रवार १ ऑगस्ट रोजी नागपंचमीनिमित्त चंदनशेष महाराजांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७:00 वाजता शेषराव नागोराव वाघ यांच्या हस्ते पुजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवसभरात एक लाख भाविकांनी चंदनशेष महाराजांचे दर्शन घेतले. सर्पदंश झालेले परिसरातील व्यक्ती येथे बारीसाठी येत असतात. दर्शन घेणार्या भाविकांमध्ये आमदार अमित झनक, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजु पाटील राजे, रिसोड पं.स. सभापती माधवराव ठाकरे, जि. प. सदस्य विश्वनाथ सानप आदिंचा समावेश होता. उत्सवादरम्यान कुठलाही वाद होऊ नये म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष रमेश वाघ, उद्धवराव वाघ, सदाशिवराव वाघ, नारायणराव वाघ, भैय्या वाघ यांनी विशेष परीश्रम घेतले. उत्सवानिमित्त लहान मोठय़ा व्यावसायिकांनी प्रसाद, पुजेचे साहित्य, मिठाई, तसेच लहान मुलांच्या खेळण्यांसह इतर वस्तूंची अनेक दुकाने परिसरात थाटली होती. नागपंचमीनिमित्त नागदेवतेला नारळाचा प्रसाद देण्याची प्रथा आहे. त्यामुळे परिसरात ५0 नारळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. या दिवशी जवळपास ५0 हजारापर्यंत नारळ विकण्यात आल्याचे बोलले जात होते. भक्तांची गर्दी पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही
भाविकांनी घेतले नागदेवतेचे दर्शन
By admin | Updated: August 2, 2014 23:15 IST