वाशिम: रासायनिक खते व बी-बियाण्याच्या किमतीचे दरपत्रक न लावता जिल्ह्यातील अनेक कृषिसेवा केंद्रे शेतकर्यांची कशी लूट करीत आहेत, याचा कारनामा 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रविवारी कैद झाला. खरीप हंगाम अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने विविध प्रकारची खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने केला आहे. प्रशासनाच्या या दाव्यात किती दम आहे, याच्या पडताळणीसाठी वाशिम शहरातील काही कृषिसेवा केंद्रांची लोकमत चमूने पाहणी केली असता, धक्कादायक बाबी समोर आल्या. दहा कृषिसेवा केंद्रात डीएपी खताबाबत विचारणा केली असता, केवळ एका दुकानदाराने डीएपी खत उपलब्ध असल्याचे सांगितले. उर्वरित दुकानदारांनी हे खत उपलब्धच नसल्याचे सांगितले. या दहापैकी पाच कृषिसेवा केंद्रांमध्ये रासायनिक खते व बी-बियाण्याचे दरपत्रक व उपलब्ध साठा दर्शविणारे अद्ययावत फलक आढळून आले नाही. तीन कृषिसेवा केंद्रामध्ये फलकच नसल्याचे दिसून आले, तर दोन दुकानांमध्ये फलक अद्ययावत असल्याचे आढळून आले. खते व बियाण्याच्या छापील किमती व शासकीय किमती यामध्ये थोडीफार तफावत असल्याने शेतकर्यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर संबंधित कृषिसेवा केंद्राच्या दर्शनी भागात शासकीय किमतीचे दरपत्रक, उपलब्ध साठा, तक्रारपेटी ठेवणे बंधनकारक आहे; मात्र या नियमाला धाब्यावर बसवून जिल्ह्यातील अनेक कृषिसेवा केंद्रांनी शेतकर्यांची लूट चालविली असल्याचे दिसून येते. कृषिसेवा केंद्रांची नियमित तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात सात भरारी पथकांचे गठन केले आहे. या पथकाने दैनंदिन साठा रजिस्टर, दरपत्रक, तक्रारपेटी आदींबाबत तपासणी करणे आवश्यक आहे; मात्र अशी तपासणी नियमित होत नसल्याने संबंधित दुकानदारांचे चांगलेच फावले आहे.
दुकानांतून दरपत्रक गायब!
By admin | Updated: June 6, 2016 02:04 IST