शिरपूर परिसरातील गावांमध्ये दरवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनची विक्रमी पेरणी केली जाते. जमीन कसदार असल्याने उत्पन्नही अपेक्षेनुसार मिळते. दरम्यान, गतवर्षी अतिवृष्टी आणि अन्य स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, आर्थिक चणचण जाणवणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांनी भाववाढीची प्रतीक्षा न करता सोयाबीनची विक्री केली, तर काही मोजक्या सधन शेतकऱ्यांनी बरेचसे सोयाबीन राखून ठेवले होते. त्यांचा आता फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत आहे. दीर्घ सुटीनंतर सोमवार, ५ एप्रिल रोजी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या शिरपूर उपबाजारात सोयाबीनला विक्रमी ६३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. उपबाजारात सोमवारी सोयाबीनची आवक ४०० क्विंटल झाली होती. यासह तुरीला सात हजार रुपये, तर हरभरा ४८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.
शिरपुरात सोयाबीनला मिळतोय ६३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST