गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक लाॅकडाऊन घोषित केले हाेते. त्यामुळे शिराळ कुटुंबातील सतीश शिराळ यांना शिक्षण अर्ध्यावर साेडून स्वगृही परतावे लागले. कुटुंबाचा आधार रामप्रकाश शिराळ यांचे अल्पकाळात निधन झाल्याने आई लताबाई शिराळ यांनी शेती कसण्यासाठी पुरुषाप्रमाणे संघर्ष करत सोयाबीन, तूर, हरभरा, मूग या पारंपरिक पिकांसह संत्रा, पपईसारख्या फळपिकांचे उत्पन्न ठिबकच्या सहाय्याने घेतले. लाॅकडाऊनमध्ये सतीश शिराळ हे गावी आल्यानंतर राजस्थान राज्यातील शिरोही जातीच्या शेळ्यांचे पालन करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि गेल्या एक वर्षापासून जवळपास तीन लाख रूपयांचे निव्वळ उत्पन्न घेत सतीश शिराळ हे परिसरातील इतर शेतकऱ्यांना शिरोही जातीच्या शेळ्यांची थेट विक्री करत आहेत. येथील प्रत्येक शेतकरी राजस्थान राज्यातील शेळी पालनाकडे आकर्षित झालेला आहे. परंतु, प्रत्येक शेतकरी हा दोन-तीन शेळ्यांच्या खरेदीसाठी राजस्थानमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे सतीश शिराळ यांचा शेळी विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे.
गतवर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये गावी परतलो, परंतु शेतीला काहीतरी जोडव्यवसाय करण्याची कल्पना सुचली आणि राजस्थानमधील शिरोही जातीच्या शेळी पालनाचा निर्णय घेतला. आज शेतीला जोडव्यवसाय म्हणून चांगल्याप्रकारे शिरोही जातीचे शेळीपालन सुरू आहे.
- सतीश शिराळ
शिराेही शेळी पालन व्यावसायिक