वाशिम : ऊन, वारा व पावसापासून प्रवाशांना संरक्षण म्हणून रिसोड ते वाशिम मार्गावर बांधण्यात आलेले निवारे प्रवाशांऐवजी इतरांच्याच पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. ११ पैकी सहा प्रवासी निवारे जमीनदोस्त झाले, तर काही निवारे अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केले आहेत. रिसोड ते वाशिम या ४0 किमी अंतराच्या मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी तत्कालीन आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांनी स्थानिक विकास निधीमधून एकूण ११ बसस्थानकावर प्रवासी निवारे मंजूर केले होते. वांगी, अडोळीफाटा, मोहोजा, तामसाळा फाटा, रिठद, बेलखेडफाटा, आसेगावपेन, चिखली, घोटा, हराळ व सवड येथे प्रवासी निवारे बांधण्यात आले. दोन-तीन वर्षे सदर निवारे चांगल्या स्थितीत होते. त्यानंतर मात्र निवार्याचे टीन, लोखंडी अँगल, आतमधील फरशी चोरून नेण्यात आली. आवश्यकता असलेल्या बसथांब्यावरीलच प्रवासी निवार्यांची दुरवस्था झाली आहे. अडोळी फाटा, तामसाळा, बेलखेड, घोटा व हराळ या पाच फाट्यांपासून वस्ती दूर आहे. त्यामुळे येथील प्रवासी निवारे सुस्थितीत असणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत या पाच ठिकाणांसह चिखली येथील निवारा जमीनदोस्त झाला आहे, तर वांगी, मोहोजा, रिठद, आसेगावपेन व सवड येथील निवारे सुस्थितीत आहेत. जमीनदोस्त झालेल्या निवार्याच्या जागेवर काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. सुस्थितीत असलेल्या निवार्याला काहींनी आपले हॉटेल, पानटपरी व इतर खाद्यपदार्थ, वस्तूंचे दुकान बनविले आहे. प्रवाशांना निवार्याअभावी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
वाशिम-रिसोड मार्गावरील प्रवासी ‘निवारा’ कोलमडला
By admin | Updated: November 12, 2014 01:54 IST