वाशिम : अद्वैत वेदांत मताचे उद्गाते, भारतीय हिंदू धर्मियांचे तत्वज्ञ, आठव्या-नवव्या शतकात कन्याकुमारी ते काश्मीर आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे भारतभर भ्रमण करून हिंदू धर्माची पुन:स्थापना करणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाचा अर्थात आदि शंकराचार्यांचा जयंती महोत्सव वाशिममध्ये रविवार, ३० एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या साक्षीने उत्साहात पार पडला. विशेष बाब म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याला दस्तुरखुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, श्रुतिसागर आश्रम, फुलगाव (पुणे)चे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती, प्रमुख आचार्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती या महान विभूतींनी हजेरी लावल्याने सोहळ्याला वेगळीच रंगत प्राप्त झाली. आदि शंकराचार्यांंच्या जयंतीचे औचित्य साधून सिव्हिल लाइनस्थित पोलीस कवायत मैदानावर यावेळी श्रुतिसागर आश्रम, फुलगाव (पुणे) द्वारा भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य जयंती, पुरस्कार वितरण, शंकरसंदेश स्मरणिका आणि माण्डूक्य उपनिषद् प्रकाशन आदी कार्यक्रमही पार पडले. या भव्यदिव्य कार्यक्रमास जिल्हाभरातून आलेल्या भक्त व हजारो नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला सायंकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली. रात्री ९.३० वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य जयंती महोत्सव समितीचे संयोजक अॅड. विजय जाधव यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या जयंती महोत्सवाच्या यशस्वितेसाठी श्री माता अमृतानंदमयी सत्संग समिती, श्री सत्यसाई सेवा समिती, पतंजली योग समिती, आर्ट आॅफ लिव्हिंग परिवार, गायत्री परिवार, समर्थ अॅकेडमी, योग वेदांत समिती, संत निरंकारी मंडळ, सूर्योदय परिवार, मारवाडी युवा मंच, सहेली उद्योजक मंडळ, माळी युवा मंच, बजरंगबली हिंदू आखाडा मंडळ, गणेश विसर्जन समिती, वारकरी संप्रदाय व भजनी मंडळ, सद्गुरु परिवार, श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मंडळ, छावा संघटना, पंचशील विद्यालंकार शिक्षण संस्था, लोकमत सखी मंच, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जे.सी.आय., बालासाहेब व्यायाम प्रसारक मंडळ, समर्थ सेवा मंडळ, व्यापारी व युवा आघाडी मंडळ, विधिज्ञ मंडळ, जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वैद्यकीय विकास मंच, इंडियन मेडिकल असोसिएशन, लायन्स क्लब, महिला भजनी मंडळ, जनजागरण मंच, सायकल स्वार ग्रुप, हिंदवी परिवार, परशुराम ब्राह्मण संघ, दिगंबर जैन सोशल ग्रुप आदी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला.
वत्सगुल्मनगरीत आदि शंकराचार्यांचा जयंती सोहळा उत्साहात
By admin | Updated: May 1, 2017 02:19 IST