ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्तरीय समितीने अधिक सतर्क राहणे आवश्यक असून, गावातच निमशासकीय, शासकीय इमारतीमध्ये किमान १० बेडचे कोविड केअर सेंटर उभारावे, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. व मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले. या अनुषंगाने गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, अनसिंगच्या ठाणेदार नयना पोहेकर, ग्रामविकास अधिकारी बोडखे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली. जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी विलगीकरणासाठी शाळा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. पाण्याची व्यवस्था, शौचालय, पंखा अशा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. वाशिम तालुक्यातील अन्य गावांमध्येदेखील संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, असे तहसिलदार विजय साळवे, गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे यांनी सांगितले.
अनसिंग येथे विलगीकरण कक्षाची सुविधा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:43 IST