वाशिम : ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींना प्रेमाची व आपुलकीची वागणूक देऊन त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांनी केले.
राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि वाशिम जिल्हा विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तामसी येथील ग्रामपंचायत सभागृहात १७ सप्टेंबर रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
न्यायाधीश शिंदे यांनी आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ विषयी मार्गदर्शन केले. जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव ॲड. एन. टी. जुमडे यांनी महिलांबाबतच्या खावटीविषयक कायद्याची माहिती दिली. यावेळी वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बदरखे, तामसीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सचिव श्यामलाल बरेठीया यांनी केले.