वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याने ८९.0४ टक्के घेत अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हय़ात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २0 हजार ५८२ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २0 हजार ५५0 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १८ हजार २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची निकालाची टक्केवारी ८९.0४ टक्के एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४२८५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ७३९३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५४९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर उर्वरित विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. उत्तीर्ण १८ हजार २९८ विद्यार्थ्यांमध्ये १0१0५ मुले व ८१९३ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.२५ तर मुलींची टक्केवारी ९१.३५ टक्के एवढी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. वाशिम तालुक्याचा सर्वात जास्त निकाल लागला आहे. वाशिम तालुका ९0.६२, मालेगाव तालुका ८८.२४, रिसोड तालुका ९0.३१, कारंजा तालुका ८७.५५, मंगरुळपीर तालुका ८६.७५, मानोरा तालुक्याचा ८९.३८ टक्के निकाल लागला आहे. वाशिम तालुक्यातून ४९६९ विद्यार्थ्यांपैकी ४५0३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मालेगाव तालुक्यात २६७८ पैकी २३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. रिसोड ४३४३ पैकी ३९२२, कारंजा ३६६३ पैकी ३२0७, मंगरुळपीर २८१६ पैकी २४४३ तर मानोरा तालुक्यातून २0८१ पैकी १८६0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. जिल्हय़ातील शाळांच्या लागलेल्या निकालामध्ये ४0 शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. वाशिम तालुक्याचा सर्वाधिक तर मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेत ९0 टक्क्यांच्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४५४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८0 ते ८५ टक्के गुण घेणारे विद्यार्थी संख्या ९१२५ इतकी आहे. दहावीच्या परीक्षेच्या निकालात २0 टक्केच्या आत निकाल लागलेली एकही शाळा नसून, गतवर्षी ४0 पेक्षा जास्त शाळांचा निकाल २0 टक्क्याच्या आतमध्ये लागला होता.
*मयुरी मागासवर्गीयातून विभागात प्रथम
माध्यामिक शालांत परीक्षेत जे.डी.चवरे विद्यामंदिरची मयुरी गजानन डाबेराव हिने ९७.८0 टक्के गुण मिळवून मागासवर्गीयातून विभागात प्रथम आल्याची माहिती मयुरीचे वडील तथा कारंजा येथील गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी दिली. तसेच याच शाळेची अनुराधा माणिकचंद बियाणी हिने ९८.६0 टक्के गुण प्राप्त केले आहेत. अनुराधा जिल्हय़ातून पहिल्या क्रमांकाचे गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे.