संतोष वानखडे / वाशिम: सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून मृत्यूला कवटाळणार्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितींच्या सभापतींनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणारी सहा वाहने नाकारून सदर निधी २0१५-१६ मध्ये आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांना समप्रमाणात देण्याचा ठराव सहा सभापतींनी पारित केला. गत तीन-चार वर्षांंपासून निसर्गाच्या लहरीपणाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळविले. २0१५-१६ या वर्षात परिस्थिती अधिकच भयावह झाली. २0१५ मध्ये पोळा सणाच्या पूर्वसंध्येला मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील दत्ता लांडगे नामक युवा शेतकर्याने पाणी असूनही सिंचनाची सुविधा उपलब्ध होत नसल्याची व्यथा मांडून मृत्यूला कवटाळले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून लांडगे यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांची चिरफाड केली होती. यादरम्यान जऊळका रेल्वेत सामाजिक संघटना, विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधींचा ताफा दाखल झाला. शेतकर्यांच्या विविध समस्यांवर मंथन झाले आणि दोन महिन्यानंतर बहुतांश मंडळीला शेतकरी समस्यांचा विसर पडला असावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २0१५-१६ या वर्षात जिल्ह्यात ६00 हून अधिक शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. यामधील बहुतांश आत्महत्या शासनाच्या जाचक अटींमुळे मदतीस अपात्र ठरल्या, तर पात्र ठरलेल्या आत्महत्यांबाबत मृत शेतकर्यांच्या कुटुंबातील वारसांना शासनाकडून मदत मिळाली. काही स्वयंसेवी संघटना, शिक्षण संस्थांनी सामाजिक बांधीलकी जोपासत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात दिला. अशीच सामाजिक बांधीलकी जोपासून जिल्ह्यातील रिसोड, वाशिम, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरुळपीर पंचायत समितीचे सभापती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. सहा सभापतींना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून जवळपास ४0 लाख किमतीची सहा वाहने मंजूर झालेली आहेत; मात्र या वाहनांऐवजी हा निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना समप्रमाणात देण्यावर सभापतींमध्ये मंथन झाले. वाशिमचे सभापती वीरेंद्र देशमुख यांनी पुढाकार घेतला.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना निधी देण्याचा ठराव
By admin | Updated: February 8, 2016 02:28 IST