अकोला: महावितरणने सुमारे ६५00 विद्युत सहाय्यकांची भरती प्रक्रिया एसएससीच्या बेस्ट ऑफ फाईव्हऐवजी एकूण सरासरी गुणांच्या आधारे राबविण्याचे ठरविले आहे.औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कंपनीने ही भरती प्रक्रिया एकूण सरासरी गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. पूर्वी दहावीत असलेल्या सहा विषयांची ७५0 गुणांपैकी परीक्षेतील टक्केवारी काढण्यात येत होती. मात्र, दहावीच्या अभ्यासक्रमात व परीक्षेत बदल झाला. आता बेस्ट ऑफ फाईव्ह ही नवीन पद्धत आली असून, यामध्ये जास्त गुण असलेल्या पाच विषयांचे मिळून दहावीची टक्केवारी काढण्यात येते. त्यामुळे आता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जास्त असते तर पूर्वी दहावी झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी असते. बेस्ट ऑफ फाईव्हची पद्धत जुनी दहावी झालेल्यांच्या दृष्टीने योग्य नसल्याची भूमिका घेऊन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेली होती. यावर खंडपीठाने बेस्ट ऑफ फाईव्हच्या टक्केवारीनुसार नियुक्ती करू नका, असा निर्णय दिला. त्या निर्णयाच्या अनुषंगाने महावितरणने एकूण सरासरी गुणांच्या आधारे भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना आपल्या एकूण सरासरी गुणांची टक्केवारी महावितरणच्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे दिलेल्या प्रणालीवर नोंदवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. याकरिता महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार त्यांच्या ऑनलाईन अर्जाचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड देऊन सादर केलेल्या ऑनलाईन अर्जामधील सर्व विषयांमध्ये मिळालेले गुण व एकूण गुण यामध्ये योग्य तो बदल करू शकता. हा बदल करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान संबंधित लिंक संकेतस्थळावर उपलब्ध राहील. त्यानंतर उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
विद्युत सहाय्यकांची भरती आता सरासरी गुणांच्या आधारे
By admin | Updated: October 27, 2014 00:00 IST