नंदकिशोर नारे / वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ामध्ये माहे जून ते सप्टेंबर २0१३ मध्ये अतवृष्टीमुळे खरडून व वाहून गेलेल्या जमिनीच्या नुकसानाकरिता ३१ मार्चला २३४३.४८ लक्ष निधी शासनाकडून वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्हय़ाला ९ कोटी ७६ लाख ८२ हजार निधी प्राप्त झाला आहे. २0१३ मध्ये पावसाळ्याच्या प्रारंभी जिल्ह्यात पावसाने एकच तांडव सुरू केला होता. परिणामी, नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपिट उडून जनजीवन पुरते विस्कटले होते. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या व नाले दुथळी वाहिले, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. दरम्यान, सदरच्या अतवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. हजारो हेक्टर जमिनीवरील पिके वाहून गेली तर बरीच जमीन खरडूनही गेलीे. नुकसानामध्ये जिल्हय़ातील शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिके पिवळी पडून मोठय़ा प्रमाणात उत्पन्न खालावले होते. माहे जून ते सप्टेंबर २0१३ या कालावधीत अतवृष्टीमुळे खरडून व वाहून गेलेल्या जमिनीच्या नुकसानाकरिता एसडीआरएफच्या निकषानुसार २0000 व २५000 प्रति हेक्टर दराने अमरावती विभागाकरिता २३४३.४८ लक्ष शासनाकडून प्राप्त झाले आहेत. निधी विभागातील जिल्हाधिकारी यांना ३१ मार्चच्या उपआ/पुनर्व/उपले/कावि/२0२/२0१५ च्या आदेशान्वये अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये खरडून गेलेल्या व वाहून गेलेल्या जमिनीचा नुकसान निधीमध्ये तालुकानिहाय वाशिम ५९ लाख ४२ हजार ७00, मालेगाव ४७ लाख ६१ हजार ५४0, रिसोड ४ लाख ३५ हजार , मंगरूळपीर ६ कोटी ६८ लाख १७ हजार ३५0, मानोरा ९५ लाख ९६ हजार ४९५, कारंजा १ कोटी १२ लाख ८ हजार ९१५ असे एकूण ९ कोटी ७६ लाख ८२ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
वाशिम जिल्हय़ाला ९.७६ कोटी निधी प्राप्त
By admin | Updated: April 3, 2015 02:35 IST