वाशिम : दक्षीण-मध्य रेल्वेच्या अकोला- पुर्णा रेल्वेमार्गावर धावणार्या रेल्वेगाडयांमध्ये बेकायदा विक्रेत्यांचा वाढलेला वावर व प्रवाशांच्या सुरक्षीतता धोक्यात असल्याचे वास्तव लोकमतने स्टिंग ऑपरेशनद्वारे ३0 ऑगस्ट रोजी चव्हाट्यावर आणले. या वृत्ताने रेल्वे पोलिसांनी आपला गाफिलपणा झटकुन ३0 ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता वाशिमहून अकोल्याकडे जाणार्या पॅसेंजर रेल्वेमधील बेकायदेशीर सात विक्रेत्यांवर कारवाईचा दंडूका उगारला. विविध माध्यमाद्वारे प्रवाशांना लुटण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढत आहेत. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मात्र दक्षीण- मध्य रेल्वे पोलिस याकडे डोळेझाक करत आहेत. दक्षीण- मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये या विक्रेत्यांचा राजरोस व्यापार सुरू आहे. अकोला ते पुर्णा या मार्गावर धावणार्या गाड्यामध्ये रेल्वे पोलिसांचे नियंत्रण नसल्याने अनेक वेळा रेल्वे सुरक्षा धोक्यात आल्याचे उदाहरणे आहेत. अकोला ते पुर्णा मार्गावर दररोज २0 ते २५ लोक चहा, वडापाव, पाणी, थंडपेये, खेळणी, आईस्क्रीम याशिवाय सिगारेट, गुटखा आदीची विक्री करणारे गाड्यामध्ये बिनदिक्कत शिरून विक्री करत असल्याचे वास्तव स्टिंग ऑपरेशनद्वारे लोकमतने ३0 ऑगस्ट रोजी उघडकीस आणले. या वृत्तामुळे दक्षीण-मध्य रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. रेल्वे प्रशासनाने वृत्ताची दखल घेत बेकायदा विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश फर्मावले. ३0 ऑगस्ट रोजी पुर्णा-अकोला या पॅसेंजर मध्ये सात विक्रेते आढळून आले. यामध्ये भांडेगाव जि. हिंगोली येथील उत्तम किसन इंगोले, कनेरगाव नाका जि. हिंगोली येथील सुभाष केरबाजी कांबळे या दोघांना गुटखा पुड्या विकतांना रंगेहात पकडले. नांदापुर जि. हिंगोली येथील सिध्दार्थ शालीग्राम डोंगरे व मेहबूब खाँ रहेमतुल्ला खाँ , कनेरगाव नाका जि. हिंगोली येथील अशोक दिलीप मोरे या तिघांना भेळ विकतांना रंगेहात पकडले. बार्शिटाकळी जि. अकोला येथील सलीमखाँ मो. खाँन व साटंबा जि. हिंगोली येथील दत्ता महादु खंडारे या दोघांना गोळ्या बिस्कीट विकतांना रंगेहात पकडले. या सातही विक्रेत्यांवर पोलिस निरिक्षक केव्हीपी नायर यांच्या मार्गदर्शनात रेल्वे पोलिस बलाचे जमादार संजय सुरवाडे, पोलिस शिपाई संतोष घुगे यांनी कारवाई केली. या सातही विक्रेत्यांना अटक करून त्यांचेविरूध्द रेल्वे अधिनियम कायदा १४४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना भुसावळ येथील रेल्वे विभागाच्या न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. या प्रकारामुळ मात्र रेल्वेत व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
रेल्वे पोलीसांनी झटकला गाफिलपणा
By admin | Updated: August 31, 2014 01:53 IST