या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारची शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस व टंकलेखन प्रशिक्षण संस्था व इतर प्रशिक्षणास मुभा देण्यात आली असून या प्रशिक्षण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी दर १५ दिवसांनी कोरोना चाचणी करून घेणे संस्थेस बंधनकारक राहील. योग्य पद्धतीने मास्क घातल्याशिवाय संस्थेमध्ये प्रवेश देऊ नये. संस्थेत प्रवेशावेळी प्रवेशद्वाराजवळ थर्मल गनद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करणे आवश्यक राहील. प्रत्येक बॅचनंतर वर्गखोली निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. संस्था चालकांनी विद्यार्थी योग्यप्रमाणे मास्क परिधान करून, सुरक्षित अंतर राखत आहेत किंवा कसे याची खात्री करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवणे आवश्यक राहील.
या नियमांचे उल्लंघन करणारी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, शिक्षण संस्था ही केंद्र सरकारने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना मालकांवर १० रुपये दंड आकारण्यात येईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार व साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांचेवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.