नंदकिशाेर नारे
वाशिम : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाशिम जिल्हयातील शिवसेनेचे लाेकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळे आणत असल्याचे पत्र पाठविले. या संदर्भात खा. भावना गवळी यांचे मत जाणून घेतले असता, रस्ते विकास कार्यात अडथळे नव्हे, तर नागरिकांच्या समस्यांना आपण रितसर, नियमानुसार संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून साेडविण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाचे, कंत्राटदारांचे काेणतेही नुकसान हाेणार नाही, असे कृत्य शिवसेनेतर्फे करण्यात आलेले नाही.
ना.गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात मेडशी ते वाशिम दरम्यान हाेत असलेल्या १२ किमी बायपासचे, मालेगाव ते रिसाेड या राष्ट्रीय महामार्गाचे एक पुलाचे तर शेलुबाजार रस्त्यावरील काम शिवसेना कार्यकर्ते यांनी थांबविल्याचे म्हटले आहे. या संदर्भात भावना गवळी यांनी नागरिकांच्या आलेल्या तक्रारी आपण स्वत: ना.नितीन गडकरी यांच्याकडे केल्याचे म्हटले आहे. रिसाेड परिसरात पडलेले खड्डयांमुळे दाेन जणांचा जीव गेल्याने, त्या भागातील शिवसैनिक प्रदीप माेरे यांनी आंदाेलन केले व रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले. यावर शिवसैनिक महादेव ठाकरे यांनी जाब विचारला व त्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी करण्यात आल्यात. त्या तक्रारी मी स्वत:च ना.नितीन गडकरी यांना पाठविल्यात, तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्रही दिले. शेलू येथून जात असलेल्या कामामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले, रस्त्यांवर पडलेले तडे, माेझरी येथील कामामुळे अनेक अपघात घडलेत, याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्यात, त्या मी संबंधितांकडे पाठवून दखल घेण्याची मागणी केली आहे. मी स्वत: सुरू असलेल्या कामावर जाऊन ना काेणते आंदाेलन केले, ना काेणती ताेडफाेड केली आहे. शिवसनेचे लाेकप्रतिनिधी म्हणजे नेमके काेण, जिल्हा परिषदेतील, पंचायत समितीतील हे कळायला मार्ग नसल्याचेही खा.भावना गवळी म्हणाल्यात. नागरिकांच्या प्राप्त तक्रारीवर नियमानुसार न्याय देण्याचे माझे कार्य मी पूर्ण केले आहे, तसेच वाशिम जिल्ह्यातील धमकीसत्राच्या चाैकशीचे गृहविभागाने राज्याचे पाेलीस महासंचालकांना पत्र पाठवून या संदर्भातील तक्रारीबाबत अहवाल मागविला आहे. या संदर्भात पाेलीस अधिक्षक वसंत परदेसी यांच्याशी चर्चा केली असता अद्याप आपणास काेणती माहिती मागविली नसल्याचे सांगितले.
....................