कारखेडा : येथील मिगारमाता बुद्ध विहारात (दि.२0) रोजी भंते अभयपूत्र यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी, गावातील मुख्य मार्गाने वाद्यांच्या गजरात बुद्ध मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.
सरपंच सुरेखा बंडूभाऊ देशमुख, ग्रामसेविका एम.जी.राठोड यांनी मिरवणुकीदरम्यान बुद्ध मूर्तीला हारार्पण केला. त्यानंतर अभयपूत्र आणि भिक्षू संघ तथा अनागारी संघ चांभई मंगरूळपीर यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या प्रसंगी भंते अभयपूत्र यांनी बौद्ध बांधवांना संबोधित केले. चित्तामध्ये बुद्ध प्रस्थापित व्हावा. वैरभाव दूर होऊन बुद्धाची समता व मैत्री संसारामध्ये प्रचलित व्हावी व मानवजातीचे कल्याण व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बौद्ध उपासक-उपासिका तथा न्यू पंचशिल मंडळ कार्यकर्ते व कार्ली, तळप, वरोली, पातूर, धानोरा येथील संघ उपस्थित होते. बुद्धमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.