वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामधून मतदारांची जागृती होत असल्यामुळे प्रशासनाचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणे योग्य आहे; मात्र देशातील लोकशाहीची वीण अधिक घट्ट करायची असेल तर मतदान सक्तीेचे करण्यात यावे, असाच काहीसा सूर शहरातील तरूणाईमध्ये सुरू आहे. लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सक्तीच्या मतदानासाठी भारताच्या राज्यघटनेत दुरूस्ती करण्यात यावी, असेही मत यावेळी तरूणाईने नोंदविले. मतदान हे कर्तव्य समजून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. असे असले तरी मतदानाची टक्केवारी वाढण्याऐवजी ती घटत चालली आहे. याची गांभिर्याने दखल घेत भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. नेमकी हीच बाब हेरून लोकमतने मतदान सक्तीचे करावे काय, हा विषय घेऊन तरूणाईची मतं जाणून घेतली. यामध्ये ६८ टक्के युवकांनी मतदान सक्तीचे करण्यात यावे, असे मत नोंदविले. तरूणाई एवढय़ावरच थांबली नाही तर, घटनेत दुरूस्ती करून सक्तीचे मतदान करावे, ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही, अश्या मतदारांना शासकीय योजनांचा लाभच देऊ नये, असे मतही तब्बल ७४ टक्के तरूणांनी व्यक्त केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार्या मतदार जागृती अभियानाचेही ५३ टक्के युवकांनी कौतुक केले आहे.
मतदान सक्तीचे करावे
By admin | Updated: October 14, 2014 01:48 IST