रिसोड : रिसोड पंचायत समितीचे विद्यमान सभापती व उपसभापतीविरूद्ध सत्ताधारी भाजपासह सेनेच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने ह्यराजकारणह्ण चांगलेच तापले आहे. पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने जून २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. भाजपाने राजकीय खेळी खेळत राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या प्रत्येकी एका सदस्याला भाजपामध्ये घेत सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे बळकावली होती. दरम्यान, दहा महिन्याच्या कालावधीत पुराखालून बरेच पाणी वाहून गेल्याने समिकरणे बदलली आणि सत्ताधारी भाजपाच्या सहा सदस्यांसह सेनेच्या सहा सदस्यांनी सभापती-उपसभापती विरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. नव्या समिकरणानुसार भाजपा व सेनेचे प्रत्येकी सहा सदस्य मिळून, दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव पारित करतील आणि नंतर सभापतीपदी भाजपा व उपसभापतीपदी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सभापती व उपसभापती अशी दोन्ही पदे भाजपाकडेच असताना, सत्ताधारी सहा सदस्यांनी सभापती व उपसभापती यांच्याविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करून ह्यभाजपाह्णसाठी नेमके काय साध्य केले? या प्रश्नाने वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने चर्चा होत आहे. ११ एप्रिल रोजी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अद्याप तारिख निश्चित झाली नाही. तारिख निश्चित झाल्यानंतर राजकीय घडामोडी वेग घेतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ऐनवेळी काय चमत्कार होतो, बारा सदस्य शेवटपर्यंत कायम राहतील काय, विद्यमान सभापती व उपसभापती हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून स्वपक्षीय नाराज सदस्यांचे मन वळविण्यात यशस्वी होतात काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
अविश्वास प्रस्तावावरून ‘राजकारण’ तापले !
By admin | Updated: April 15, 2017 13:25 IST