वाशिम : ट्रिपलसिट मोटारसायकल चालविणार्या आर्मी जवानाला कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसाने थांबविल्याचा राग आल्याने आर्मीच्या जवानाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज सोमवारला सकाळी ११:३0 वाजता घडली. याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये भादंविचे कलम ३५३, ३२३, ५0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार शहर वाहतूक शाखेमधील पोलिस शिपाई रवी आश्रू खडसे आज ८ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कर्तव्य पार पाडत होते. दरम्यान, सकाळी ११:३0 वाजता एम.एच. ३७ एन १८७३ क्रमांकाची मोटारसायकल ट्रिपलसिट दिसल्याने खडसे यांनी मोटारसायकल थांबविली. यावेळी वाहतूक पोलिस शिपाई खडसे हे वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल १00 रुपये दंड आकारून कारवाई करीत होते; मात्र मोटारसायकलवरील प्रवासी तथा आर्मीमध्ये कर्तव्यावर असलेला श्रीकिसन नारायण उगले याने खडसे यांना कारवाई न करता आम्हाला सोडून द्या, असे म्हणून शिवीगाळ केली. यावर खडसे यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला असता उगले याने खडसे यांना मारहाण करून शिवीगाळ केली. हा प्रकार सुरू असताना खडसे याच्या मदतीला वाहतूक पोलिस शिपाई ज्ञानेश्वर म्हात्रे धावून आले; मात्र म्हात्रे यांच्या अंगावरही उगले याने हात उगारून शिवीगाळ केली. कर्तव्यावर असलेल्या वर्दीतील पोलिस शिपायांसोबत सुरू असलेली झटापट पाहण्यासाठी आंबेडकर चौकामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यानंतर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणून मोटारसायकलवर असलेले परमेश्वर सुभाष उगले, सुखदेव नारायण उगले व आर्मीमधील शिपाई श्रीकिसन नारायण उगले यांना ताब्यात घेतले. या तिघांवर वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये मोटारसायकल वाहन कायद्याचे उल्लंघन करणे तसेच भादंविचे कलम ३५३, ३२३, ५0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तिघांनाही जामीन मंजूर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जवानाची वाहतूक पोलिसाला मारहाण
By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST