सचिन राऊत/ अकोला : शहरापासून जवळच असलेल्या कापशी (जुनी) गावात मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाल्यानंतर, पोलिसांनी गावात रात्रभर धुडगूस घातला. तब्बल २00 पोलिसांच्या जमावाने १00 हून अधिक दुचाकींची तोडफोड केली. गरोदर महिला, वृद्ध, मुलांना घराबाहेर काढून, तर काहींच्या घरात घुसून पोलिसांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांच्या या ह्यगुंडगिरीह्णने संपूर्ण गाव दहशतीत आहे. गृहराज्यमंत्री (शहर) व अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घटनेची माहिती घेतली असून निष्पाप ग्रामस्थांना त्रास देणे मुळीच सर्मथनीय नसल्याचे स्पष्ट केले. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कापशी येथील तलावाच्या काठावर दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुगार खेळला जातो. जुगाराचे प्रमाण एवढे मोठे असते की, परिसराला यात्रेचे स्वरूप येते. मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी पातूर पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी किरकोळ कारवाई केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने साध्या वेशात छापा मारला. त्यात काही जुगार्यांवर कारवाई केल्यानंतर विशेष पथक व यात्रेकरूंमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र त्यानंतर तब्बल २00 पोलिसांचा ताफा कापशी येथे धडकला. त्यांनी संपूर्ण गावात प्रचंड नासधूस व तोडफोड केली. जयश्री विवेक मानतकर या गरोदर महिलेच्या पोटावर पोलिसांनी काठय़ा टोचल्या. पोलिसांना रोखणार्या विवेक मानतकर यांनाही बेदम मारहाण केली, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी १00 ते १५0 ग्रामस्थांनी पोलीस पथकावर हल्ला केला. त्यात १0 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगीतले. घटनेनंतर काही पोलीस कर्मचारी सापडत नव्हते, त्यांचा गावात शोध घेताना ग्रामस्थांनी पुन्हा पोलिसांवर हल्ला केला. याप्रकरणी आठ जणांवर कारवाई करण्यात आली. गावात घडलेल्या प्रकारात पोलीस दोषी असतील, तर त्यांचीही वरिष्ठ अधिकार्यांमार्फत चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घडलेला प्रकार प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. परंपरेनुसार काही गोष्टी चालत असतील, त्यावेळी काही चुकीचे होत असेल, तर पोलिसांनी जाऊन रीतसर सांगायला हवे होते. साध्या वेशात जाऊन कारवाई करणे योग्य नाही.
*ग्रामस्थांवरच गुन्हे
जुगार अड्डय़ावर छापा मारणार्या पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी १00 ते १५0 ग्रामस्थांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. पोलिसांनी आठ ग्रामस्थांना अटकही केली.