मंगरूळपीर (वाशिम): शहरातील तहसील कार्यालय परिसर व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीची अवस्था दयनीय झाली असून, संबंधित वरिष्ठ अधिकार्यांचे याकडे पूर्णणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. तालुकाभरातील विविध प्रकारच्या आणि कोट्यवधी रुपयांच्या खरेदी-विक्रीची कामे तहसील कार्यालय परिसरात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत करण्यात येतात. त्या दृष्टीने हे कार्यालय अतिशय उत्तम स्थितीत आणि विविध सोयी-सुविधायुक्त असायला हवे; परंतु परिस्थिती अगदी त्याविरुद्ध आहे. या कार्यालयाची इमारत दर्जाला शोभण्यासारखी नाहीच शिवाय या इमारतीची अवस्थाही मोडकळीस आली आहे. इमारतीचे छत क्षतिग्रस्त झाल्यामुळे त्यावर मेनकापड टाकण्यात आले आहे. त्याशिवाय भितींनाही तडे गेले असून, इमारतीच्या सभोवताल असलेला संपूर्ण परिसर घाणीच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंंधी पसरली आहे. त्यामुळे येथे विविध कामानिमित्त येणार्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनतेच्या विविध प्रकारच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारे कार्यालय महत्त्वपूर्ण असले तरी, या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. उल्लेखनीय बाब अशी, की खरेदी-विक्रीच्या व्यवहारांशी संबंधित नोंदींचे जतन करण्याची जबाबदारी या कार्यालयावर सोपविण्यात येते. त्याशिवाय या कार्यालयाकडे इतरही महत्त्वाच्या जबाबदार्या आहेत. हे लक्षात घेता कार्यालयाची इमारत ही सुसज्ज आणि मजबूत असायला हवी; परंतु इमारतच काय, तर या इमारतीच्या सभोवताल असलेल्या कुंपणभिंतीलाही ठिकठिकाणी तडे गेले आहेत. तालुकास्तरीय कार्यालय असलेल्या या इमारतीच्या परिसरात स्वच्छतेची काळजीसुद्धा घेण्यात येत नाही.
शासकीय इमारतीची दुर्दशा
By admin | Updated: October 27, 2014 00:35 IST