मानोरा: तालुक्यात १५ आॅगस्ट २०१५ च्या विशेष ग्रामसभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश द्यावेत, अशी मागणी सत्यजित देविदास शेरे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे, की मानोरा पंचायत समितीमार्फत ३९२ विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या विहीरींना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे या विहिरी अपूर्ण आहेत. यापैकी सुमारे १५० विहीरींना कार्यारंभ आदेश देताना रोहयोचा प्राधान्यक्रम राबविल्या गेला नाही. ज्या विहिरींना कार्यारंभ आदेश दिले. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. उर्वरित २७२ शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरींना प्रशासकीय मान्यता असली तरी, कार्यारंभ आदेश नसल्याने त्या अपूर्णच आहेत.२०१५ मध्ये ज्यांनी विहिरीसाठी अर्ज केले होते. त्यांनी पुन्हा २०१७ मध्ये अर्ज केले. कृती आराखड्यात असणाऱ्या विहिरी रद्द होत असतील, तर प्रशासनाची पारदर्शकता कोठे आहे, पालकमंत्री सिंचन विहिर योजनेतून १ हजार विहिरींचे लक्ष तालुक्याला आहे. त्याबाबत इश्वरचिठ्ठीद्वारे लाभार्थी निवडले जात आहेत.ही प्रक्रियाही नियमानुसार होताना दिसत नाही. त्यामुळे २०१५ मध्ये ज्या विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाल्या त्या विहिरंींना कार्यारंभ आदेश देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासकीय मान्यता प्राप्त विहिरींंना कार्यारंभ आदेश द्यावेत !
By admin | Updated: March 27, 2017 13:32 IST