शेलूबाजार आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत ४ उपकेंद्र आहेत. या चारही उपकेंद्रांतर्गत ५२ गावे येतात. या सर्व गावांत मिळून २९ हजार ६०० लोकसंख्या आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केवळ एक गाव वगळता शेलूबाजारसह इतरही गावांत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. शिवाय, काही जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने शेलूबाजार परिसरात निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली, तर आरोग्य विभागाने चाचण्यांना वेग देऊन बाधितांवर तातडीने उपचारही केले. त्यामुळे परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आले असून, जुलै महिना अखेरपर्यंत केवळ दोनच नवे कोरोनाबाधित परिसरात आढळून आले आहेत. त्यात ५ जुलै रोजी १, तर १७ जुलै रोजी दुसरा असे दोनच रुग्ण आढळून आले. याच आरोग्य केंद्रांतर्गत जून महिन्यात १५ कोरोनाचे रुग्ण सापडले होते.
--------
ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन
शेलूबाजार परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आले असले तरी कोरोना संसर्ग संपूर्णपणे संपलेला किंवा नष्ट झालेला नाही. आवश्यक काळजी न घेतल्यास कोरोना संसर्ग पुन्हा पसरण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे आणि नाका, तोंडावर मास्क नेहमी लावूनच वावरण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.