ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी व उन्हाळी हंगामातील मका, ज्वारी, मूग व भुईमूग, इत्यादी पिके घरी आली आहेत. अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे जसे महत्त्वाचे आहे; तसेच उत्पादन केलेले धान्य सुरक्षित साठवणे गरजेचे असते. याबाबत शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध माहिती देण्याकरिता भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र, वाशीमद्वारे ‘घरगुती स्तरावर सुरक्षित धान्य साठवणूक’ या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाच्या तांत्रिक सत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी प्रशिक्षणार्थींना कृषी विज्ञान केंद्राच्या सेवा व सुविधांबाबत माहिती देत शेती व शेती पूरक व्यवसायाला संबंधित विषयाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतकरी तसेच महिला बचत गटांची प्रगती होणे सोपे होईल असे सांगितले. कृषी विज्ञान केंद्र वाशीमचे गृह विज्ञान शाखेच्या प्रमुख शुभांगी वाटाणे यांनी ग्रामीण भागात धान्य साठवणुकीमध्ये येणाऱ्या अडचणी, साठवणुुकीदरम्यान होणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव व त्यावरील उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपल्याला उत्तम प्रतीचे अन्नधान्य मिळून आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल; तसेच चांगल्या प्रकारचे बियाणे घरीच उपलब्ध होईल असे पटवून दिले. एस. आर. बावस्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
सुरक्षित धान्य साठवणूक या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:41 IST