किनखेडा : पाऊस लांबल्याने उडीद, मूग पीक हातचे निघून गेले आहे. सोयाबीन, तूर, कपाशी या पीक उत्पादनातही काही प्रमाणात घट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जवळपास ६0 ते ७0 एकरात कांद्याच्या गाठीची लागवड झाली आहे. पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत शेतकरीवर्ग नवीन वाटा चोखाळत आहे. कमी एकरात जास्त उत्पादन देणारी वाण शोधत आहेत. भाजीपाला, फळवर्गीय शेतीकडे अनेक शेतकरी वळत आहेत. याप्रमाणेच कांद्याची लागवडही केली जात आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने एक चांगला पर्याय म्हणून अडीच-तीन महिन्यात तयार होणार्या कांद्याला पसंती दिली जात आहे. गुजरातमधून आणलेल्या कांदा गाठ (बी) या प्रकाराची लागवड केली जात असल्याचे प्रगतशील शेतकरी पवन बेलोकार यांनी सांगितले. रिसोडचा परिसर, किनखेडा, चिखली, हराळ आदी परिसरात कांद्याची लागवड करण्याकडे शेतकर्यांचे कल आहे.
** कांद्याच्या गाठीला सर्वाधिक पसंती
सध्या पाऊस लांबल्याने सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी कांदा लागवडीला प्राधान्य देत आहेत. बी पद्धतीने कांदा तयार होण्यासाठी साधारणत: पाच ते सहा महिन्याचा कालावधी तर कांद्याच्या गाठ पद्धतीने लागवड केली तर अडीच महिन्यात कांदा तयार होतो. गाठ तयार होण्याकरिता तीन-साडेतीन महिने लागतात. गाठ तयार झाल्यानंतर अडीच महिन्यात कांदा तयार होतो. त्यामुळे कांद्याच्या गाठीला 'बळीराजा' प्राधान्य देत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे