शौचालय असूनही लोक शौचालयाचा वापर न करता उघडयावर शौचास जात असल्याचे विदारक चित्र जिल्हयात पाहावयास मिळत आहे. यावर मात करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांनी शौचालयाचा वापर करावा, या हेतूने गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता सर्व गावांमध्ये ग्राम स्वच्छता निगराणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या पुढाकाराने सुरुवातीला निवडक ५० गावांमध्ये ही मोहीम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. तसेच या ५० व्यतिरिक्त इतरही गावात उघडयावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुडमॉर्निंग पथकाच्या सहा वाहनचालकांना टुल कीटचे वितरण करण्यात आले. शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप मोहनावाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे, पाणी व स्वच्छता विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी रवी सोनोने, जिल्हा कक्षाचे क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, पाणी गुणवत्ता सल्लागार अभिजित दुधाटे आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन स्वच्छ भारत मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांनी केले.