देशात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस विकसित झाल्यानंतर या लसीचे प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सचे उद्दिष्ट निश्चित करून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात वाशिम जिल्ह्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्स मिळून १००६४ लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यात ९ फेब्रुवारीपर्यंत फ्रंटलाईन वर्कर्ससाठी असलेल्या ५३२४ लसीकरणाच्या उद्दिष्टापैकी ३६४५ लसीकरण झाले, तर ११ फेब्रुवारीपर्यंत एकूण १००६४ च्या उद्दिष्टापैकी ५९७८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. ठरलेल्या उद्दिष्टानुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे दोन डोज दिले जाणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे रिअॅक्शन येते, कोरोनाची लागण होते, असा समज झाल्याने अनेकांनी प्रारंभी ही लस घेण्याचेही टाळले; परंतु हळूहळू हा समज दूर झाल्याने लस टोचून घेण्यास प्रतिसाद मिळू लागला. त्यात आजवर लस टोचून घेतलेल्या ५९७८ जणांपैकी एकालाही कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
-----------
५० जणांना मळमळ, उलट्या
जिल्ह्यात ५९७८ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. त्यापैकी एकालाही कोरोना संसर्ग झाला नाही. तथापि, लस घेतल्यानंतर ५० जणांना सुरुवातीचे तास, दोन तास मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवला. थोडी विश्रांती घेतल्यानंतर ५० जण पूर्वीप्रमाणे स्वस्थ झाले आणि कर्तव्यावर रुजूही झाले.
-----------
लस घेतल्यानंतर चार तास विश्रांती आवश्यक
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी ही लस घेतल्यानंतर अस्वस्थ वाटणे, मळमळ, उलट्या होण्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान चार तास विश्रांती घेणे आवश्यक आहे. शिवाय फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, तोंडाला मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणेही आवश्यक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----
कोट: जिल्ह्यात आजवर ५९७८ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. या लसीमुळे कोणालाही कोरोना संसर्ग झाला नाही किंवा दुष्परिणामही जाणवले नाही. काही लोकांना मळमळीचा किरकोळ त्रास झाला; परंतु ते सर्व स्वस्थ आहेत.
-अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम