२००९ मध्ये परिसीमन आयोगाच्या शिफारशीवरून वाशिम लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. या मतदारसंघातील काही भाग नव्याने गठीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात, तर रिसोड आणि मालेगाव हे दोन तालुके अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाले. मात्र, खासदार संजय धोत्रे हे मालेगाव व रिसोड तालुक्यांमधील गावांना क्वचितच भेट देतात. २०१९ मध्ये खासदार धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने रिसोड व मालेगाव तालुक्यातील जनतेला त्यांच्याकडून अधिक अपेक्षा लागल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्या मालेगाव, रिसोड दौऱ्याला अधिकच ब्रेक लागला. मागील वर्षीपेक्षा या वर्षी कोरोनाचे रुग्ण रिसोड, मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात निष्पन्न होत आहेत.
विशेषतः गोवर्धना, शेलगाव बगाडे, केनवड, नेतंसा, शिरपूर या गावांमध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. तरीही खासदार तथा केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी साधी भेट देण्याचेही औचित्य दाखविले नाही. या भागातील मतदारांनी २००९, २०१४, २०१९ या तीनही लोकसभा निवडणुकीत धोत्रे यांना मोठा लीड दिला आहे. असे असताना कोरोनाच्या काळात मात्र दोन्ही तालुके खासदारांच्या प्रेमाला मुकले, अशी चर्चा होत आहे.
.......................................
बॉक्स:
अपेक्षा पूर्ण होतील काय?
मालेगाव व रिसोड तालुक्यातील जनतेच्या खासदारांकडून विशेष अशा कुठल्याही अपेक्षा नाहीत. मात्र, तालुक्यातील कोविड रुग्णांना वाशिम येथे बेड, गरजूंना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध असायला हवे. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून लसीकरणाला गती मिळावी, रेमडेसिविर इंजेक्शनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी प्रयत्न करावे, अशा काही रास्त अपेक्षा असून, त्या खासदार धोत्रे पूर्ण करतील काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.