अल्पवयीन मुलांचे बालपण कोमेजू नये, त्यांना मुक्तपणे खेळू-बागडू द्यावे, शिक्षण घेऊ द्यावे, यासाठी शासनाने स्वतंत्र कायदा तयार केला आहे; मात्र त्याची चोख अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी वाहन दिल्यास कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असताना रस्त्यांवर भरधाव वेगात वाहने चालविताना अल्पवयीन मुले सर्रासपणे आढळून येतात. यासह घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काही मुलांना नाइलाजास्तव ऑटो चालविण्याचा उद्योग करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाशिम बसस्थानकानजीक असाच एक अल्पवयीन मुलगा ऑटोमधून प्रवासी वाहतूक करत असल्याचे पाहावयास मिळाले.
..................
कोट :
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. काही अल्पवयीन मुले ऑटोंमधून प्रवासी वाहतूक करत असतील, तर ही बाब गंभीर असून याकडे लक्ष पुरविले जाईल.
- नागेश मोहोड
शहर वाहतूक शाखा निरीक्षक, वाशिम