विवेक चांदूरकर /वाशिम: लंकेपासून मेरू पर्वतापर्यंंंत असलेल्या जगाच्या मध्यरेषेवर वाशिम येथील मध्यमेश्वराचे मंदिर असून, वाकाटकांच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाले आहे. या ठिकाणी पूर्वी वेधशाळा होती. लंकेपासून तर मेरू पर्वतापर्यंंंत आखलेल्या मध्यरेषेवर त्या काळातील लोकांना ग्रह, तारे याचे ज्ञान व्हावे याकरिता येथे वेधशाळा सुरू करण्यात आली होती. तसेच येथे शिवलिंगाची स्थापना मध्यमेश्वर मंदिराचे निर्माण करण्यात आले. मध्यमेश्वर मंदिरासंबंधित वत्सगुल्म माहात्म्य या ग्रंथात उल्लेख असून, तो पुढीलप्रमाणे आहे. चामुंडा तीर्थाच्या उत्तरेस मध्यरेखा दर्शविणारे मध्यमेश्वर नावाचे लिंग आहे. या लिंगाचे माहात्म्य सांगा म्हणून वासुकी राजाने विनंती केल्यावरून वशिष्ठ मुनी म्हणाले, की पूर्वी देवयुगात ग्रह, नक्षत्र, राशी यांचे लोकांना ज्ञान नव्हते. त्यामुळे लोकांना अडचण येत होती. त्यावेळी ऋषी सत्यलोकांत ब्रह्मदेवाकडे गेले व आम्हाला काल ज्ञान व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यावर ब्रह्मदेवाने वेदांग ज्योतिष पाहिले की कालज्ञान होईल, असे सांगितले. यावरून ऋषींनी वेदांग ज्ञान प्राप्त करून घेऊन नारदादी संहिता निर्माण केल्या. त्यातून उदयास्त, चंद्र-सूर्याची ग्रहणे, आयुप्रमाण यांचे ज्ञान दैवज्ञांना होऊ लागले. त्याचप्रमाणे देशांतराचे परिज्ञान व्हावे म्हणून लंकेपासून मेरूपर्यंंंत त्यांनी मध्यरेखा कल्पिली. त्यावरून भूगोल ज्ञान व ग्रहांचे गणित करणे शक्य झाले. ही रेखा लंकापुरी, देवकन्या, कांची, श्वेतगिरी, पर्यली, तसेच वत्सगुल्म उज्जयिनी तेथून सुभेपर्यंंंंत जाते. वत्सगुल्म हे त्या रेषेचे मध्य कल्पून त्या मध्यभागावर मध्यमेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन केले. या लिंगाच्या ईशान्य दिशेने नीलकंठेश्वर नावाचे लिंग आहे. या ठिकाणी पूर्वी एक वेधशाळाही होती. तेथे ऋषी-मुनी ग्रह-तार्यांचा अभ्यास करीत होते.
जगाच्या मध्य रेषेवर असलेले मध्यमेश्वर मंदिर
By admin | Updated: January 25, 2016 02:10 IST