ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 31 - दिवाळी सणामध्ये पारंपरिक दिव्यांबरोबरच परंपरेनुसार चालत आलेलं दिवाळीतील प्रकाशाचं आणखी एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे आकाश कंदिल. प्रत्येकाच्या घरासमोर आकर्षक, निरनिराळ्या प्रकारचे, विविध रंगाच्या आकाश कंदिलांची सजावट करण्यात आली आहे. मात्र, कामरगावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गोपाल खाडे यांनी आकाश कंदिलाच्या माध्यमातून 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हा सामाजिक संदेश दिला आहे.
खाडे मास्तरांनी स्वतः हा भव्य स्वरुपातील कंदिल बनवला आहे. या आकाश कंदिलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, खाडे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. शिक्षक खाडे स्वच्छता अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या सामाजिक योजनांबाबत जनजागृती करत आहेत. पंढरपुरातील यात्रेदरम्यान देखील त्यांनी रोबोट बनवून 'बेटी बचाओ बेटी पढाओ'चा संदेश दिला होता.