१९ मार्च १९८६ यादिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्याने संपूर्ण कुटुंबीयांसह आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. साहेबराव करपे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात शेतकऱ्यांच्या समस्यांचे वर्णन केले होते. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अद्यापही शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबू शकले नाही. चालू महिन्यापर्यंत राज्यात सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर राज्यात दरदिवशी ४० ते ५० हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. वाशिम जिल्ह्याचा विचार करता गत पाच वर्षांत जिल्ह्यातील ४३० शेतकऱ्यांनी नापिकी, सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यापैकी केवळ २२९ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर तब्बल २०९ प्रकरणे शासनाच्या निकषात न बसल्याने मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. त्यात २०१९ मध्ये ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी केवळ ४९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर ४३ प्रकरणे अपात्र ठरली, तसेच गतवर्षी ८२ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागून मृत्यूला कवटाळले. त्यापैकीही केवळ ३० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर ४२ प्रकरणे अपात्र ठरली असून, १० प्रकरणे चौकशीत आहेत.
--------
१) कारखेडा येथील रोहिदास कोंडबा जाधव (५२) या अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून ३० ऑगस्ट २०२० रोजी विजेची जिवंत तार हातात घेऊन कारखेडा शिवारातील नदीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असून, अद्यापही त्यांच्या कुटुंबाला शासनाची आर्थिक मदत मिळाली नाही. (18६ँ08)
------------
२) मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील दत्ता रामचंद्र हळदे (६०) यांनी २२ जानेवारी २०२० रोजी घरातील सर्व मंडळी कामासाठी बाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला वर्ष उलटले. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून १ लाखांची आर्थिक मदत मंजूर झाली. त्यापैकी ३० हजार खर्चासाठी मिळाले, तर उर्वरित ७० हजार पाच वर्षांनी मिळणार असून, त्यांच्या परिवाराचा जीवन जगण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे.
----------
३) कारंजा तालुक्यातील दुघोरा येथे ८ नोव्हेंबर २०१९ रोजी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून श्रीकृष्ण रंगराव पुंंड या ३६ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात विधवा पत्नी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. त्यांच्या विधवा पत्नीला शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.
-----------
२०१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या- ९२
मदतीसाठी पात्र ठरलेली प्रकरणे- ४९
--------------
२०२० मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या- ८२
मदतीसाठी पात्र ठरलेली प्रकरणे- ३०