००००००००००
रस्त्यावर पुन्हा फेरीवाले
वाशिम : वाशिम शहरातील रस्त्यावर उभे राहून फेरीवाले हे मालाची विक्री करीत असल्याचे मंगळवारी दिसून आले. मध्यंतरी रस्त्यावर फेरीवाले राहत नव्हते. आता पुन्हा फेरीवाले हे रस्त्यावर, रस्त्यालगत उभे राहत असल्याचे दिसून येते.
०००००
आरक्षण देण्याची मागणी
वाशिम : परीट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी धोबी समाज महासंघाने जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे केली. देशाच्या १७ राज्यांत धोबी समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहे.
००००००००००
सर्पमित्रांकडून तीन सापांना जीवदान
वाशिम : सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी विविध ठिकाणी आढळलेल्या ३ सापांना निसर्ग फाउंडेशनच्या सदस्यांनी सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे.
००००
ग्रामसेवकांची ३० पदे रिक्त
वाशिम : जिल्हाभरात ग्रामपातळीवर प्रशासकीय कामकाज सांभाळणाऱ्या ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे शेतकरी, ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. जिल्हाभरात ३० ग्रामसेवकांची पदे रिक्त असून, ही पदे भरण्याची मागणी होत आहे.
०००
५८ वाहनांवर दंडात्मक कारवाई
वाशिम : शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत वाशिम शहरात मंगळवारी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५८ वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला.
०००००
मोबदला देण्याची धरणग्रस्तांची मागणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील धरणांकरिता जमीन संपादित केलेले शेतकरी अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ मोबदला देण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.
०००००
कवठा परिसरात आरोग्य तपासणी
वाशिम : व्हायरल फिव्हर पाहता आरोग्य विभागाकडून दक्षतेच्या दृष्टिकोनातून कवठा परिसरात आरोग्य तपासणी व सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
०००००
ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेची मागणी
वाशिम : रिसोड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. यासह स्वच्छताही ठेवली जात नाही. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी सोमवारी केली.
००००००
रोहित्रांना संरक्षक कठड्याचा अभाव
वाशिम : जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे असून, संरक्षक कठड्याचा अभाव असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
००००