शिखरचंद बागरेचा / वाशिम
वाशिम नगर परिषद अंतर्गत कोंडवाड्याची व्यवस्था उपलब्ध असताना संपूर्ण शहरासह प्रमुख चौकामध्ये मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रहदारी करणार्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोंडवाड्याची व्यवस्था पाहण्यासाठी आरोग्य निरीक्षक अंतर्गत केवळ एक शिपाई कार्यरत असून, एकट्या शिपायाच्या खांद्यावर कोंडवाड्याची जबाबदारी आहे. मागील वर्षी २७ मार्च १२ रोजी कोंडवाडा भाडेतत्त्वावर देऊन चालविण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. १0 मे २0१२ ते ३१ मार्च २0१३ या कालावधीमध्ये कोंडवाडा चालविण्याचा खासगी ठेका देण्यात आला होता. कोंडवाड्यामध्ये कोंडण्यात आलेल्या मोकाट जनावरे सोडविण्यासाठी दंड आकारणी करण्यात येते. यामध्ये म्हैस सोडविण्यासाठी ४00 रुपये प्रतिदिवस, बैल व वळूसाठी ३00 रुपये, गाढव व डुकरांसाठी २00 रुपये तर शेळी, मेंढी, बकरीसाठी १00 रुपये प्रतिदिवस दंड वसूल करण्यात येतो. शहरातील नागरिकांनी मोकाट गुरांबाबत संबंधित विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत; पण त्या तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही.