लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : खेड्यापाड्यांमध्ये फिरून किरकोळ दुकानदारांना गोळ्या-बिस्कीट विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी अशोक बिरदीनंद छापरवाल (रा.मालेगाव) हे परतीच्या मार्गावर असताना रात्रीच्या अंधारात चार चोरट्यांनी त्यांचा मिनीट्रक अडविला. वाहनाची चाबी बाजूला फेकून देत छापरवाल यांच्या हातावर चोरट्यांनी चाकूचे सपासप वार करून त्यांना ४0 हजार रुपयांनी लुटले. मालेगाव-मेहकर मार्गावरील डोंगरकिन्ही गावानजिकच्या मुंगळा फाट्यावर १४ जुलै रोजी रात्री ९.४५ वाजता "रोड रॉबरी"चा हा थरार घडला. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, व्यापारी छापरवाल हे नित्यनेमाप्रमाणे रात्रीच्या सुमारास मालेगावला परततात आणि त्यांच्याकडे रोख "कॅश" असते. याची तंतोतंत माहिती असलेल्या चार चोरट्यांपैकी दुचाकी वाहनाने आलेल्या दोघांनी मुंगळा फाट्यावर छापरवाल यांचे वाहन अडविले. यावेळी वाहनाची चाबी बाजूला फेकून देत चोरट्यांनी छापरवाल यांना वाहनातून खाली ओढून त्यांच्या हातावर चाकूने हल्ला केला. याचवेळी दुसर्या दुचाकीने आलेल्या दोघांनी मिनीट्रकच्या मागे वाहन उभे करून छापरवाल यांच्या गळ्यातील बॅग हिसकावून घेतली. त्यातील रोख रक्कम आणि छापरवाल व मिनीट्रकच्या चालकाचा मोबाइल, असा एकंदरित ४0 हजार रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी व्यापारी छापरवाल यांनी १५ जुलै रोजी सकाळी मालेगाव पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून चारही चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश धोत्रे पुढील तपास करीत आहेत.
चाकू हल्ला करून व्यापा-याला लुटले!
By admin | Updated: July 16, 2017 02:17 IST