लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो. स्टे: यंदा सुरुवातीच्या पावसानंतर आसेगाव परिसरात जवळपास ९० टक्क्याहून अधिक पेरणी पूर्ण झाली; परंतु आता दोन आठवड्याहून अधिक काळापासून पावसाचा पत्ताच नसल्याने खरिपातील सर्वच पिके संकटात सापडली असून, सोयाबीन पीक पिवळे पडत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी मृग नक्षत्रापूर्वीच २८ मे रोजी आसेगाव परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे लोकांना उन्हाळ्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आणि शेतकऱ्यांनीही मशागतीला वेग दिला. त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अधूनमधून बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीलाही वेग दिला आणि जूनच्या पंधरवड्यातच परिसरातील ९० टक्के पेरणी आटोपली. यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात खरिपाची पिके उगवून डोलू लागली; परंतु आता मागील १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे १० जूननंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. परिसरात ८० टक्के शेतकरी पावसावरच अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांची पिके सुकत चालली आहेत. तर उर्वरित २० टक्के शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पाणी तुषार सिंचनाच्या आधारे वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कृषी विभागातील जानकारांच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली, तर पिके हिरवी होऊन त्यांची जोमदार वाढ होईल; परंतु पावसाने आठवडा भरात हजेरी लावली नाही, तर अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असून, अनेक ठिकाणी उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून, त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. आसेगाव परिसरात ७० टक्क्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून, हे पीक पावसाअभावी पिवळे पडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
पावसाअभावी खरीप पिके संकटात!
By admin | Updated: July 11, 2017 01:52 IST