मंगरुळपीर: तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आसेगाव पोलिस स्टेशनमधील एका प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाने महिला प्रवाशांशी असभ्य वर्तणूक केल्याचा प्रकार शनिवारी घडला आहे. वाशिम येथून येणाऱ्या एका वाहनात सात महिला प्रवास करीत होत्या. हे वाहन वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील आसेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या धानोरा येथे आले असता आसेगाव पोलिस स्टेशनमधील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाने त्या वाहनाला थांबण्याची खुण केली. चालकाला रस्त्यावरील ती गर्दी न दिसल्याने वाहन पुढे गेले. पोलिसांनी पुढे जाऊन ते वाहन थांबविले. तेथे वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करूनही केवळ इशारा केल्यानंतर वाहन न थांबविल्याने तिनशे रुपये दंडाची वसुली वाहनचालकाकडून केली. एवढ्यावरच प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाचे समाधान झाले नाही. तर त्यांनी वाहनातील महिला प्रवाशांना गाडीतून उतविले आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी असलेल्या काळीपिवळी वाहनातून प्रवास करण्यास सांगितले. या संदर्भात आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता. आपण सध्या वाशिम येथे पोलिस भरती प्रक्रियेत व्यस्त असल्याने याबाबत काही माहिती नाही; परंतु याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाची महिला प्रवाशांशी असभ्य वर्तवणूक
By admin | Updated: March 25, 2017 20:32 IST