नंदकिशाेर नारे
वाशिम : येत्या २२ ऑगस्ट राेजी रक्षाबंधन असल्याने बाहेरगावी असलेल्या भावांसाठी बहिणींची राख्या खरेदीची लगबग सुरु झाली आहे. यावर्षी राख्यांच्या भावात माेठ्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे भाऊ-बहिणीच्या या नात्याला महागाईची झळ बसल्याचे दिसून येत आहे.
भावा बहिणीच्या प्रेमाचा राखी पाैर्णिमा सण ८ दिवसावर आला तरी पाहिजे त्या प्रमाणात शहरात दुकाने थाटलेली दिसून येत नाहीत. काही दुकाने लागली असून बाहेरगावी असलेल्या भावासाठी बहिणी राखी घेत आहेत.
............
बाजारात आलेल्या विविधांगी राख्या
रक्षाबंधनानिमित्त बाजारात विविध रंगांच्या व लहान मुलांसाठी विशेष कार्टूनच्या राख्या विक्रीस आल्या आहेत. यामध्ये सिल्व्हर, गाेल्डन काेट असलेल्या राख्या महाग असल्यातरी दिसण्यास आकर्षक असल्याने बहिणी आपल्या भावांसाठी त्या खरेदी करताना दिसून येत आहेत. बालके विविध कार्टूनच्या राख्यांना पसंती देत असल्याचे चित्र वाशिम शहरातील दुकानांवर दिसून येत आहे. तसेच बाजारात गाेंडा राखी, राजस्थानी राखी, रेशीम राखी, स्पायडरमॅन, मिकीमाऊस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाईट, जू जू वंडरबॉय राख्यांचा समावेश आहे.
बाजारात देव राख्यांचेही भाव गगनाला
मानाची राखी म्हणून ओळख असलेल्या ‘देव’ राख्यांचेही भाव माेठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. दोन ते अडीच रुपये डझनने मिळणाऱ्या राख्यांची किंमत दुप्पट झाली असून काही ठिकाणी ५ रुपये तर कुठे ६ रुपये डझनने विकत घ्यावी लागत आहे. विशेष म्हणजे या राख्या देव पूजनासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.
असे आहेत राख्यांचे भाव
पाच रुपयांपासून ५०० रुपये किमतीच्या तसेच लहान मुलांची राखी १० रुपयांपासून आहे.
............
काय म्हणतात राखी विक्रेते.....
पेट्राेल, डिझेल व ट्रान्सपाेर्ट खर्च वाढल्याने राखीच्या हाेलसेल भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे किरकाेळ विक्रीतही वाढ अपेक्षित आहे.
- करण नेणवाणी, वाशिम
मी स्कूल बसचालक आहे. यावर्षी स्कूलबस बंद असल्यामुळे प्रथमच या व्यवसायाकडे वळलाे. सध्यातरी दुकानांवर पाहिजे त्या प्रमाणात रेलचेल दिसून येत नाही.
- रमाकांत बारटक्के, वाशिम
राख्यांमध्ये भाववाढ माेठ्या प्रमाणात झाली आहे. गतवर्षीचा काेराेनामुळे माल शिल्लक आहे. ताे आणि काही नवीन माल घेऊन दुकान थाटले आहे. कार्टून राखीकडे लाेकांचा कल आहे.
- आनंद वानखेडे, वाशिम
गत १० वर्षांपासून या व्यवसायात आहे. यावर्षी प्रथम माेठ्या प्रमाणात राख्यांचे भाव वाढले आहेत. पेट्राेल, डिझेल दरवाढीचा हा परिणाम असावा.
- अनिल यादव, कारंजा