मानोरा : शेतीसाठी सालगडी ठेवण्याची पारंपरिक पद्धत आजही ग्रामीण भागात आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगड्याला पुढील वर्षभराच्या कामापोटी दिला जाणारा मोबदला ठरविला जातो. अलीकडे मजुरांची कमतरता असल्याने मजुरीमध्ये वाढ झाली असून, सालगड्यांनीही मजुरीचे दर वाढविले आहेत. याशिवाय गहू, ज्वारी ही धान्य व अंगावर (उसने) पैसे मागितले जात आहेत. यामुळे शेतमालकांचे आर्थिक बजेट वाढले आहेत.
मानोरा तालुक्यात धामणी, मानोरा, कारखेडा, वरोली, तळप, कारपा, जवळा, आसोला आदी गावांमध्ये सालगडी ठेवण्याची पद्धत पूर्वीपासूनच रूढ आहे. गावात किंवा तालुक्यात सालगडी मिळाले नाही तर बाहेरील तालुक्यातून, जिल्ह्यातून सालगडी आयात केले जातात. सालगडी मिळाला की त्याला व त्याच्यासोबतच्या कुटुंबातील इतर सदस्यांना राहायला जागा देणे किंवा शेतात त्यांची राहण्याची व्यवस्था करून द्यावी लागते. बाहेरून आलेले हे सालगडी काही वर्ष त्या गावात राहिले की ते तेथीलच रहिवासी झाल्याचीही अनेक उदाहरणे घडलेली आहेत.
अलीकडे अनेक लोक कामासाठी शहरात स्थलांतरित झाले आहेत, तर काही मजूर शेतीशिवाय इतर कामे करीत आहेत. त्यामुळेच शेतीसाठी सालगड्यांची कमतरता भासत आहे.
.......................
उचल म्हणून २५ टक्के रक्कम
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बोलणी झाल्यानंतर तातडीने संबंधित सालगड्याला उचल म्हणून ठरलेल्या रकमेतील २५ टक्के रक्कम द्यावी लागते. बाहेरगावच्या सालगड्याची शेतात किंवा गावात कुठेतरी राहण्याची व्यवस्था करावी लागते. सोबत कुटुंब असते. त्यांच्याही कामाची सोय लावावी लागते.
.......................
कोट
पूर्वी प्रत्येक शेतमालकाकडे सालगडी ठेवले जायचे. धामणी गावात सर्वच शेतमालकाकडे सालगडी होते. काही सालगडी एकाच मालकाकडे १० ते १५ वर्षे काम करायचे. त्यामुळे त्यांच्यात मालक व मजूर अशी भावना न राहता ते एकाच कुटुंबातील सदस्य म्हणून राहायचे. मग त्यांच्यात व्यवहार वजा होऊन पैसे, धान्य याचा हिशेब राहत नव्हता. आता मात्र तसे सालगडी मिळत नाहीत.
अभिजित विठ्ठलराव पाटील
आदर्श शेतकरी, धामणी, मानोरा